बोलणारी गृहा तात्पर्य कथा | बोलणारी गृहा बोधकथा | Talking cave meaning story in Marathi

बोलणारी गृहा तात्पर्य कथा | बोलणारी गृहा बोधकथा | Talking cave meaning story 


बोलणारी गृहा तात्पर्य कथा


एक दिवस काय झालं, एक सिंह शिकारीच्या शोधात अटकत होता. तो खूप फिरला, त्यानं खूप शोधलं; पण त्याला शिकार मात्र मिळाली नाही. मग तो सिंह हताश अन् निराश होऊन परत येत असताना त्याचं लक्ष एका जागेकडे
गेलं. ती एक गुहा होती. जंगलातली गुहा; म्हणजे त्या गुहेत नक्कीच कुणी तरी प्राणी राहात असणार.

बोलणारी गृहा तात्पर्य कथा | बोलणारी गृहा बोधकथा | Talking cave meaning story

तो प्राणी बाहेर आल्यावर आपण त्याची शिकार करण्यापेक्षा... आपणच गुहेत घुसावं अन् त्या आतल्या प्राण्याची शिकार करावी, ह्या विचारांत तो सिंह खरंच त्या गुहेत घुसला. आणि थोड्या वेळातच खरोखर त्या गुहेत राहणारा कोल्हा तिथं आला. त्या गुहेच्या जवळ येताच त्या चाणाक्ष कोल्ह्याच्या नाकाला कसला तरी उग्र वास आला.

त्यानं नीट निरखून इकडं-तिकडं पाहिलं तर त्याला पायाखालच्या मातीत सिंहाच्या पावलांचे ठसे दिसले. त्या पावलांचा मार्ग काढत कोल्हा पुढे गेला तर .... त्याच्या लक्षात आलं, की ती पावलं नेमकी आपल्या गुहेतच गेली आहेत... बरं, पावलांच्या खुणा ह्या फक्त आत जाणाऱ्याच होत्या; परतीच्या पाऊलखुणा काही दिसत नव्हत्या. याचा अर्थ असा की, सिंहाची स्वारी नक्कीच अजून आतच आहे. काय करावं ! आत जाणं तर धोक्याचंच! पण तो सिंह आत आहे का नाही; ह्याची खात्री कशी करणार? कोल्हा डोकं खाजवीत बसला.

थोड्या वेळातच त्याला एक कल्पना सुचली. त्यानं एकदम मोठ्यानं हाक मारायला सुरुवात केली.. अगं ए गुहे... अगं ए गुहे...! आता असं गुहेला हाक मारून ती निर्जीव गुहा काही बोलणार होती का ? मग कोल्होबा आपणच म्हणाला, "का गं गुहे, तू आज माझ्यावर रागावलीस का? तू बोलत का नाहीस? हे बघ, तू जर माझ्याशी रोजसारखी बोलली नाहीस, तर मी दुसरीकडे निघून जाईन...”

आणि युक्ती लागू पडली. त्याच गुहेत असणाऱ्या सिंहाला असं वाटलं की, खरंच ही गुहा बोलकी असली पाहिजे. आता जर गुहेतून आवाज आला नाही, तर गुहेच्या दाराशी
आलेला कोल्हा निघून जाईल. तेव्हा आतूनच सिंहानं एक मोठी गर्जना केली. झालं, इकडे कोल्होबाच्या मनाची खात्री झाली अन् त्यानं जीव वाचवण्यासाठी दूर जंगलात धूम ठोकली. जाता जाता तो एवढंच म्हणाला " हा सिंह कसला राजा ? त्याला एवढंसुद्धा कळत नाही का, की गुहा कधीच बोलत नाही.” 

तात्पर्य :- ज्याच्याकडे युक्ती आहे, तो प्राणी आपली मोठमोठ्या संकटांतूनही सहज सुटका करून घेऊ शकतो.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post