मुक्या प्राण्यांनाही भावना असते तात्पर्य कथा | Dumb animals also have feelings in Marathi

मुक्या प्राण्यांनाही भावना असते तात्पर्य कथा | Dumb animals also have feelings 


मुक्या प्राण्यांनाही भावना असते

सुख-दुःखं, मान-अपमान हे असे प्रसंग मनुष्याला असतात. तसेच ते मुक्या प्राण्यांनाही असतात. मालकानं प्रेमानं अंगावरून फिरविलेला हात घोड्याला कळतो. मालकानं हड़-हड़ म्हणून दूर लोटलेल्या कुत्र्याला कळतं, धन्यानं जे शिकवले, ते गोड बोल पोपटाला कळतात, हे जसं खरं, तसेच... एखाद्या प्राण्याला जर आपण झिडकारलं, त्याच्या अंगावर हात उगारला, काठी दाखविली, तर त्याला तेही कळतं. प्राणी मुके असले म्हणजे त्यांना भाव-भावना व्यक्त करता येत नाहीत; असे नाही. काही वेळेला प्राणी आपला राग, नाराजी ही कृतीतून व्यक्त करतात.

मुक्या प्राण्यांनाही भावना असते तात्पर्य कथा | Dumb animals also have feelings

भोला अन् त्याचा मित्र हत्ती, ह्यांची ही गोष्ट. भोलाराम हा एक गरीब, प्रेमळ अन् जगन्मित्र माणूस, भोलारामचे जसे गावातले सगळेच लोक हे मित्र, तसेच गावातली गायी गुरं, कुत्री- मांजरी, इतकंच नव्हे, तर त्या गावात असलेला एक हत्तीपण भोलारामचा मित्र होता. गावातल्या हमरस्त्यावर भोलारामचं एक हार-फुलांचं दुकान होतं. त्याच रस्त्यावर एक गणपतीचं मंदिर होतं; त्यामुळं भोलाच्या दुकानी नेहमी भाविकांची गर्दी असे. भोलारामच्या दुकानातील बरीच हार-फुलं ही गणपतीच्या गळ्यात घातली जायची.

त्या गावात जो एक हत्ती होता, त्या हत्तीचापण एक नेम होता. तो रोज दुपारी नदीवर जायचा, स्नान करायचा अन् ओलेत्यानं डुलत डुलत जाऊन गणपतीचं दर्शन घ्यायचा. परत येताना हत्ती भोलारामच्या दुकानापाशी आला की, भोला मोठ्या प्रेमानं आवाज द्यायचा - "आवो । गजराज..." आणि हत्ती जाऊन त्या भोलाच्या दुकाना उभा राहायचा. भोलाराम मग त्या हत्तीला कधी नारळ, कधी केळ फळ, कधी ऊस, काही ना काही

तरी हमखास द्यायचा. त्या दोघात कळत-नकळत एक मैत्रीचं नातं तयार झालं होतं. कधी कधी तर भोला आनंदानं हत्तीच्या गळ्यात छानशी माळ घालायचा. हत्ती आनंदायचा अन् मग मोठ्या डौलात गळ्यातली घंटा वाजवत भोलारामच्या दुकानासमोर नाचायचा. असं हे हत्ती अन् भोलाराम ह्यांचं प्रेम अनेक दिवस चालू होतं... पण...

एक दिवस भोलाच्या मनात काय आलं, कुणास ठाऊक ! हत्ती आला. त्यानं घंटा वाजवली, लहानशा फळाच्या अपेक्षेनं त्यानं भोलारामकडे सोंड पुढे केली... पण... त्या दिवशी हत्तीला नारळ, केळ, फळ, ऊस ह्यातलं काहीच मिळालं नाही; तर..... उलट कसल्याशा नादात भोलारामनं कधी नव्हे ती हत्तीच्या सोंडेला हार विणायची टोकदार मोठी सुई टोचली... त्या चमत्कारिक अनुभवानं हत्तीला मात्र कळून चुकलं की, आज काही तरी गडबड आहे. त्या टोकदार सुईच्या वेदनेनं हत्ती कळवळला, मागं सरला, टचकन त्याच्या चिमुकल्या डोळ्यांत पाणी आलं.

हत्तीनं एकवार ओल्या नजरेनं भोलारामकडे पाहिलं, तर उलट भोलाराम कशी झाली सजा, म्हणून हसत होता.
अन् त्याचंच त्या मुक्या प्राण्याला खूप वाईट वाटलं; राग आला... हत्ती आल्या वाटेनं परत गेला.....
थोड्या वेळानं हत्ती परत आला आणि... नदीवर जाऊन सोंडेत भरून आणलेले चिखलाचं राडपाणी त्यानं भोलारामच्या अंगावर अन् दुकानभर उडवलं. त्या चिखलाच्या माऱ्यानं भोलारामचं अंग मळलं. फुलांचे तयार हार, फुलं सारंच राडेराड झालं.

भोलारामला आपली चूक अन् मुक्या प्राण्याचा राग, दोन्ही कळलं. मात्र त्या एवढ्याशा सुईनं त्या दोघांची मैत्री मात्र दुरावली. तो हत्ती पुन्हा कधी-कधीसुद्धा भोलारामच्या दुकानाजवळ थांबला नाही. 

तात्पर्य : मुक्या प्राण्यांनाही भावना असतात.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post