रॉयल बेंगॉल टायगरची गोष्ट The story of the Royal Bengal Tiger in Marathi

आपल्याला शालेय अभ्यासक्रमांत बऱ्याच बाबी चुकीच्या शिकवल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, जंगलचा राजा सिंह. आपल्या देशात हिमालयापासून दक्षिणेकडील जंगलांत वाघ निर्धास्तपणे संचार करतो. त्यामुळे तोच खऱ्या अर्थानं भारतीय जंगलांचा राजा आहे. सिंह आता फक्त गीर अभयारण्यापुरता मर्यदित झाला आहे. त्यांची संख्याही फक्त सहाशेंच्या दरम्यान आहे. सिह समूहानं शिकार करतो. वाघ मात्र एकट्यानं शिकार करतो. त्यामुळेच वाघ जंगलाचा अनभिषिक्त सम्राट असतो.

रॉयल बेंगॉल टायगरची गोष्ट The story of the Royal Bengal Tiger in Marathi

अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी वाघ

भारतीय जंगलांतील अन्न साखळीच्या सर्वोच्च स्थानी वाघ असतो. त्याच्यामुळेच निसर्गाची विविधता आणि संपन्नता कायम राहते. त्यामुळे निसर्गातील इतर प्राण्यांच्या संख्येमध्ये समतोलता राहून पर्यायाने निसर्गाचा समतोल टिकवला जातो. म्हणूनच वाघाचं अस्तित्व अनन्यसाधारण आहे. नैसर्गिक अधिवासाचा नाश, अवैध शिकार, तस्करी, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे आज वाघांची संख्या प्रचंड वेगाने कमी होत आहे. त्याबाबत जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी २९ जुलैरोजी विश्व व्याघ्र दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसाची घोषणा करताना २०२२ मध्ये जगभरातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं. जगभरातील वाघांच्या संख्येपैकी ७५ टक्के वाघ केवळ भारतात आहेत.  भारतामध्येही २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय ठेऊन त्याच्या संवर्धनाचं काम सुरू आहे.

प्रोजेक्ट टायगर’ चं यश

वाघांच्या संवर्धनासाठी १९७३ मध्ये भारत सरकारने ‘प्रोजेक्ट टायगर’ हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरू झाला. प्रोजेक्ट टायगरसाठी नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अॅथॉरिटी स्थापन करण्यात आली. वाघांच्या हालचालीवर पाळत ठेवण्यात आली. त्यामुळे आपोआपच त्यांच्या शिकारीवर नियंत्रण आले. त्यामुळे आता वाघांची संख्या त्याच्या दुप्पट झालेली दिसत आहे.  विकासाच्या नावाखाली मानवाने सुरू केलेल्या काही विध्वंसक कृतींमुळे वाघांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे.  त्यातूनच मग मानव-व्याघ्र संघर्षाची धग वाढत आहे. हा संघर्ष कमी करायचा असेल तर मानवाने वाघांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये अतिक्रमण करणं बंद करायला हवं. ज्या ठिकाणी वाघांचा अधिवास असतो, त्या ठिकाणी जंगलं असतात. वाघांचा संबंध थेट निसर्गाच्या संवर्धनाशी असतो. त्यामुळे वाघांचे संवर्धन केल्यास पर्यायाने निसर्गाचंही संवर्धन होतं.

वाघ अजूनही संकटग्रस्त

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात सुमारे एक लाखांहून अधिक वाघ होते. वर्ड वाईल्डलाईफ फंडच्या आकडेवारीनुसार सध्या ही संख्या केवळ ३०९९ इतकी आहे. यापैकी सुमारे २९६७ वाघ हे केवळ भारतात आढळतात. त्यामुळे  भारतात या दिवसाचं महत्त्व मोठं आहे. गेल्या आठ वर्षांत भारतात ७५० वाघांचा मृत्यू झाला. या वर्षी पहिल्या ८१ दिवसांत भारतात वाघांचा मृत्यूचा आकडा ३५ वर पोचला आहे. त्यात एकट्या महाराष्ट्रात १५ वाघांचा मृत्यू झाला आहे. या वरून  वाघ अजूनही संकटात आहेत, हेच स्पष्ट होतं. 
 
भारतात सापडणारा वाघ (रॉयल बेंगॉल टायगर) हा जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु, अवयवांच्या तस्करीसाठी अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या कमी होत आहे. जंगलतोड आणि वाघांच्या अधिवासावर अतिक्रमण यामुळे मानव आणि वाघांमध्ये संघर्ष निर्मांण होताना दिसत आहे.  

कॉरिडॉर वाढले, तरच वाघाला भवितव्य

मे २०२१ च्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या ५१ व्याघ्र प्रकल्प आहेत. भारतामध्ये २०१८ च्या आकडेवारीनुसार २९६७ वाघ आढळले. सध्या जंगलाच्या सीमांवर मोठी वृक्षतोड सुरू आहे. त्यामुळे दोन जंगलांना जोडणारे मार्ग (कॉरिडॉर) नष्ट होत आहेत. हे असंच सुरू राहिलं तर कालांतरानं हे सर्व व्याघ्र प्रकल्प मोठ्या प्राणीसंग्रहालयांसारखे बनून जाण्याचा धोका आहे. कारण कॉरि़डॉरच नष्ट झाले, तर दोन प्रकल्पांतून वाघांची ये-जा बंद होऊन आदान-प्रदान बंद होण्याची भीती आहे. कॉरिडॉर उद्ध्वस्त झाल्यानंतर वन्यप्राणी गावात येण्याच्या घटनांत वाढ होते. त्यातून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वाघ संघर्षाच्या अनेक घटना घडत आहेत. वाघाचं व पर्यायानं जंगलांचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post